भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यातच काहि दिवसांपूर्वी पहाटे साडेचार वाजताच्या वेळेस आरोपीला मेडिकलला नेण्यावरून दोन पोलीस कर्मचार्यांमध्ये तुफान जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांचा कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. सदरील सर्व प्रकरण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून त्यात मारामारी करणार्या पोलिसांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अहवाल घेतला होता. मात्र सदरील प्रकरण हे पोलिसांनी दाबले असल्याची चर्चा आहे. तर मारामारी करून खाकी वर्दीची अब्रू घालणार्या पोलीस कर्मचार्यांना अजूनपर्यंत निलंबित केलेले नाही. यात बिट मार्शल म्हणून काम करणार्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
पोलीस ठाण्यातील पोर्चमध्ये पंकज कदम नावाचा पोलीस कर्मचारी दुसर्या शुभम धात्रक या पोलीस कर्मचार्याला ओढत फरफटत बारनिशी स्टेशन हाऊस समोरून घेऊन जाऊन मारहाण करत असल्याचे दिसत आहेत. आजपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल किंवा निलंबनाची कारवाई केलेली नाही आहे. दोन महिन्यांपूर्वी २८ नोव्हेंबर २०२४ ला पहाटे ४ च्या सुमारास विमल डेअरी जवळ एक अपघात झाला होता. अपघाता मध्ये स्कुटी चालकाच्या हाताच्या बोटाला किरकोळ मार लागला होता. त्याला मेडिकल करता घेऊन जायचे होते. मात्र बिट मार्शल कर्मचारी उपस्थित नसल्याने पोलीस उपनिरीक्षक फडके यांनी पोलीस शिपाई भवर आणि मसुब कर्मचारी यांना शासकीय वाहनाने मेडिकल करता पाठवले होते. सदरचे कर्मचारी मेडिकलला जाऊन परत आले. त्यानंतर बीट मार्शल पोलीस शिपाई पंकज कदम हे पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी पोलीस शिपाई शुभम धात्रक देखील पोलीस ठाण्यात हजर होते. मेडिकल करता फडके यांना बीट मार्शल पोलीस शिपाई धात्रक यांनी सांगितले असा समज कदम यांना झाला. या कारणावरून पोलीस शिपाई धात्रक यांच्यासोबत कदम यांनी वाद घालण्यास सुरूवात केली तसेच त्यांना कानाखाली मारल्याची घटना घडली. या घटनेबाबत सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात दोघांनाही बोलावून समज देऊन पोलीस शिपाई कदम यांचा कसुरी रिपोर्ट तयार करण्यात आला होता. आता पोलीस उपायुक्तांना कसुरी अहवाल सादर करण्यात आला आहे. मारामारी करणार्या पोलीस कर्मचार्यावर त्यांची जबाबदारी निश्चित करून नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.