बोईसर : पालघर – मनोर रस्त्यावर शेलवली गावाच्या हद्दीत रेमी कंपनीसमोर हा विचित्र अपघात घडला. अपघातानंतर वाहचालक फरार झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणार्या भरधाव जीपने रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले. उज्वला रमेश जाधव (रा. देवकोप, तांडेलपाडा) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. उज्वला जाधव या (नर्स )परिचारिका असून बोईसर येथील एका रुग्णालयात त्या काम करत होत्या. सायंकाळी त्या रिक्षातून कामावरून घरी जात होत्या.
यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणार्या भरधाव जीपने या रिक्षासह मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षा व मोटरसायकलसह त्या जीपचाही चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर जखमी रामभाऊ सापटे, उज्वला जाधव, रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच दुचाकीवरील समीर लढे व सुनीता वाढण यांना पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उज्वला उमेश जाधव यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर रामभाऊ सापटे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जीप चालक फरार असून याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.