विरार : देशभरात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यातच नालासोपारा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाने वसई- विरार शहरात वर्षभरात २९ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये १२ महिला १७ पुरुषांना ताब्यात घेतल्याची माहिती अँटी ह्युमन ट्रॅफिकींग पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी दिली. वसई- विरार शहरात मागील एक वर्षापासून छुप्यारीत्या अवैध वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी आपली यंत्रणा राबविण्यात सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नालासोपारा सनशाईन पोलीस ठाण्याच्या वतीने जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये २९ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे बांगलादेशी वसई -विरार शहरात कसे आले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई पोलिसांनी बनावट पद्धतीने नागरिकत्व मिळून घुसखोरी करणार्या बांगलादेशींविरोधात तीव्र कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या झाडाझडतीत बांगलादेशी छुप्या पद्धतीने कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे समोर आले आहे. शहरात घुसखोरी करून राहणार्या बांगलादेशी नागरिकांकडे वसईमध्ये राहत्या ठिकाणचे आधार कार्ड आहे तसेच राहत्या ठिकाणचा पत्ता आहे. तसेच यांच्याकडे स्थायी खाते ( पॅन कार्ड ) आहेत. असेच त्यांच्याकडे जन्माचा दाखला सापडला आहे .हे नागरिक अनेक वर्षापासून राहत असल्याचे कारवाईच्या दरम्यान निदर्शनास आले आले.
या बांगलादेशी नागरिकांकडे हे कागदपत्रे कसे आले ? कागदपत्रे कोणी बनवली? कोणत्या ठिकाणी बनवली? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. तसेच भारतात प्रवेश करताना आपल्या बॉर्डरवर तपास केला जातो, तरीही भारतात घुसखोरी कशी केली ? याचा देखील तपास केला जाणार आहे, अशी माहिती अनैतिक ट्रॅफिकिंग पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी बोलताना सांगितले आहे.