भाईंदर : मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील मिरा- भाईंदर परिसरातील वरसावे उड्डाणपुलावर वाहने थांबविण्यास मनाई असतानाही त्याठिकाणी अनेक लोक हे रस्त्यावर व कडेला आपल्या चारचाकी व दुचाकी गाड्या पार्क करून सिगल पक्षी सह अन्य जलचर पक्षांना खाद्यपदार्थ टाकत त्यांच्याजवळ जाऊन सेल्फी काढत असतात. अशा ३२५ वाहनचालकांवर काशीमिरा वाहतूक शाखा पोलिसांनी कारवाई करत दंड आकारला आहे. काशिमीरा वाहतूक पोलिसांच्या वतीने वरसावे उड्डाणपूलावर सेल्फी घेण्यासाठी वाहन थांबवण्यास मनाई असताना देखील वाहन थांबावून सेल्फी घेणार्या वाहन चालकांवर काशिमीरा वाहतूक पोलिसांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे.
गेल्या दोन महिन्यांत वर्सोवा पुलावर सेल्फी करता वाहने थांबवणार्या एकूण ३२५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून दंड आकरण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या मार्फत वारंवार कारवाई करण्यात आल्या नंतर देखील वाहन चालक वर्सोवा पुलावर वाहने थांबवून सेल्फी घेताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या मार्फत पुलावर वाहतूक कर्मचारी नेमण्यात यावेत जेणेकरून पुलावर वाहन थांबवण्यावर रोख लागेल, अशी मागणी नागरिकांनी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. वाहतूक पोलिसांमार्फत वर्सोवा पुलावर दोन्ही बाजूस सूचना फलक लावण्यात आले असून त्यावर देखील पुलावर वाहन उभे करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नविन वर्सोवा पुलावर सेल्फी घेण्यासाठी वाहने थांबतात यामुळे सदर पुलावर वाहतूक कोंडी व अपघात देखील होण्याची शक्यता आहे. मुंबई-ठाणे बाजूकडून गुजरात बाजूकडे जाणारे व गुजरात बाजूकडून मुंबईकडे येणा-या नविन वर्सोवा पुलावर दोन्ही वाहिनीवर वाहन थांबण्यास प्रतिबंध नो-पार्किंग करण्यात आले आहे. याबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबई, ठाणे बाजूकडून गुजरात बाजूकडे जाणार्या व गुजरात बाजूकडून मुंबईकडे येणार्या वर्सोवा नविन पुलावर दोन्ही वाहिनीवर नो-पार्किंग करण्यात आले आहे.
सदरची वाहतूक नियंत्रण अधिसुचना ही मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालच्या हद्दीत येणार्या अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलीस वाहने, महसूल विभागाची वाहने, फायरब्रिगेड, पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्कूल बसेस, भाजी-पाला वाहून नेणारी वाहने, रुग्णवाहिका, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, जिल्हा दंडाधिकारी मुंबई, ठाणे, पालघर व मनपा आयुक्त मुंबई, मिरा- भाईदर, वसई-विरार तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही. सध्या वर्सोवा पुलावर येणार्या सिगल पक्षी यांना बघण्या करता व त्यांचे फोटो घेण्यासाठी वाहन चालक वाहने पुलावर उभी करत असल्याने त्यांच्या वर कारवाई करण्यात येते.