भाईंदर : मिरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर चार वर्षे तीन महिन्यांनी आयुक्तालयात खंडणी विरोधी पथक स्थापन करण्यात आले असून त्यात एक पोलीस निरीक्षक, दोन दुय्यम अधिकारी, १२ पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदरील खंडणी विरोधी पथकाचे मुख्यालय हे काशीमिरा गुन्हे शाखेच्या शेजारी असणार आहे. या कार्यालयातून खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास केला जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार ठाणे ग्रामीण पोलीस आणि पालघर जिल्हा पोलिसांचे विभाजन करून मिरा – भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुक्तालय १ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिसांना काम करावे लागले होते.
त्यातच आयुक्तालयात खंडणी सारख्या गंभीर गुन्हयांचा सखोल तपास होवून खंडणी प्रकरणातील सर्व गुन्हयांना प्रतिबंध व्हावे याकरीता गुन्हे शाखेअंतर्गत एक स्वतंत्र खंडणी विरोधी पथक स्थापन होणे गरजेचे असल्याने पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशाने खंडणी विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यात पोलीस निरीक्षक राहुल राख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरा -भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना केल्यानंतर आयुक्तालयाचे प्रथम पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले होते. आयुक्तालयात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे, ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस कारवाई करण्यामध्ये देखील आघाडीवर आहेत. पोलीस कारवाई करत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात असताना त्यात आता प्रामुख्याने खंडणी विरोधी पथकाची स्थापना झाल्याने तेही काम करणार आहे. त्याला पोलीस आस्थापना मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखे अंतर्गत खंडणी विरोधी पथक कार्यान्वीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
खंडणी विरोधी पथकाचे कार्य
प्रत्येक पोलीस आयुक्तालयात खंडणी विरोधी पथक असते. खंडणी विरोधी पथक हा गुन्हे शाखेतील एक खास कक्ष आहे. खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, अंमली पदार्थ संबंधित गुन्हे, अंडरवर्ल्ड टोळी आणि संगठित गुन्हेगारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासणीसाठी खंडणी विरोधी पथक काम करते.