भाईंदर : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या प्रवाशांबरोबर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबई रेल्वे पोलिसांतर्गत चार नवीन पोलीस ठाणी स्थापन करण्यास सोमवारी मंजुरी दिली आहे. यामध्ये भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याचा समावेश आहे. सोमवारी गृह विभागाने उपनगरीय रेल्वे स्थानकावर नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशन, भाईंदर रेल्वे स्टेशन, अंबरनाथ रेल्वे स्टेशन आणि आसनगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी नव्याने रेल्वे पोलीस ठाणी सुरू करण्यात येणार आहे. मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकावरील मिरारोड, भाईंदर मार्गावरील प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकावर अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अपघात, चोरी, छेडछाड, मारामारी, लैंगिक छळ अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीच्या वस्तूंमध्ये बहुतेकदा मोबाईल फोन, बॅगा आणि इतर वस्तूंचा समावेश असतो. मिरारोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकावर एखादी घटना घडली तर तक्रार देण्यासाठी वसईला जावे लागत होते. वसई हे मिरारोड, भाईंदरपासून लांब आहे. त्यामुळे तक्रारदाराला गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा तक्रार देण्यासाठी आपला वेळ व पैसा दोन्ही खर्च करावा लागत होता. या त्रासामुळे अनेक जण तक्रार देखील देण्यास जात नव्हते. वसई रेल्वे पोलीस ठाण्यावर कामाचा ताण जास्त असल्यामुळे गुन्ह्याच्या तपासासाठी दिरंगाई देखील होत होती. अनेक तक्रारदाराला चौकशीसाठी जावे लागत होते, त्यासाठी त्यांना चकरा माराव्या लागत होत्या. भाईंदरला नव्याने रेल्वे पोलीस ठाणे झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. नागरिकांची वेळेची व पैशाची बचत होणार आहे. तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर ते गुन्हे लवकर उघडकीस आणण्यास मदत होईल असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.