विरार : विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनारा साफसफाई करण्यासाठी आता मनुष्यबळाच्या ऐवजी यंत्रणेचा वापर होणार आहे. या मशीनचे उद्घाटन अर्नाळा समुद्र किनारी करण्यात आले. समुद्र किनार्याच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने पुढाकार घेतला आहे. समुद्र किनार्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे, असे ग्रामविकास अधिकारी नितीन राणे यांनी बोलताना सांगितले.
समुद्र किनार्याची स्वच्छता राखणे स्थानिक प्रशासनासाठी मोठे जिकरीचे काम ठरत होते. मानुष्यबळाचा वापर करून विस्तीर्ण समुद्र किनार्याची स्वच्छता राखणे अशक्य ठरत होते. प्रामुख्याने पावसाळ्यात समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर वाहून येत असतो, यात प्लास्टिक व इतर प्रकारच्या कचर्याचा समावेश असतो. सामाजिक संस्थांच्या मदतीने अधून मधून समुद्र किनार्याची स्वच्छता मोहीम राबविली जात होती. मात्र यात सातत्य राखणे अवघड असल्याने किनारे अस्वच्छ राहण्याचे प्रमाण मोठे होते. याच अनषंगाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने पहिल्यांदाच अर्नाळा समुद्र किनार्याच्या स्वच्छतेसाठी अधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे.ही मशिन्स ट्रॅक्टरच्या सहाय्याने समुद्रकिनारी वापरता येणार आहे. समुद्र किनार्यावरील रेती चाळून त्यातील कचरा साफ करण्याचे काम या माध्यमातून करता येणार आहे. या मशिनच्या माध्यमातून समुद्र किनार्यांची स्वच्छता केली जाईल. कचरा उचलणे, त्याचे संकलन करणे, संकलित केलेल्या कचर्याची विल्हेवाट लावणे, वाळूत साचलेल्या कचर्याचे संकलन करणे, वाळूचे सपाटीकरण करणे यासारखी कामेही केली जाऊ शकणार आहेत. यंत्राच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
Edited By Roshan Chinchwalkar