तलासरी: शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणातील चार आरोपींना घोलवड पोलिसांनी अटक करून डहाणू न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि घोलवड पोलीस अद्याप मुख्य सुत्रधार अविनाश धोडी आणि इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत. गुरुवारी घोलवड पोलिसांनी विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे या चार आरोपींना न्यायालयात हजर केले. चौकशीत या आरोपींचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या चौघांची कसून चौकशी सुरू असून, अपहरण प्रकरणातील अन्य धागेदोरे उलगडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी पोलिसांना गुंगारा देऊन पोलीस चौकीतून फरार झाला. त्याच्या फरारीमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग अविनाश धोडीचा शोध घेत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच या प्रकरणात अजून काही नवीन आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. घोलवड पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आगामी काळात या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.