डहाणू: तलासरी तालुक्यातील वेवजी काटेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक रमण धोडी हे डहाणूहून खासगी कारने घरी येत असताना सोमवार 20 जानेवारी पासून बेपत्ता झाले आहेत. आज तब्बल 9 दिवस उलटूनही पोलीस तपासाला यश आले नसल्याने कुटुंबियांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. डहाणूवरून येणार्या वेवजी डोंगरी येथे घाट रस्त्यावर ग्रामस्थांना संशयास्पद वस्तू आढळून आल्याने या घटनेवरून अशोक धोडी यांचे कारसह अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. याबाबत घोलवड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 20 जानेवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. पोलीस अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये संशयित चार आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. लवकरच बाकीचे आरोपी हे ताब्यात घेतले जातील.
महत्त्वाची बाब म्हणजे अशोक धोडी यांचे सख्खे भाऊ अविनाश धोडी यांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांनी पोलिसांना चकवा देत पोलीस ठाण्यातून पळ काढला. पोलीस त्यांचादेखील तपास करत आहेत. कुटुंबियांनी सांगितलेल्या माहितीनुसार अशोक धोडी हे कामानिमित्त डहाणू येथे आपली ब्रिझा कार ठेवून ट्रेनने मुंबईला गेले होते. 20 जानेवारी रोजी सोमवारी संध्याकाळी डहाणु रेल्वे स्थानकात उतरून वेवजी तालुका तलासरी येथे घरी येण्यासाठी निघाले. मात्र ते घरी पोचलेच नाही. तेव्हापासून अशोक धोडी आणि त्यांची कार बेपत्ता आहे. आज नऊ दिवस उलटूनही यांचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे अपहरण झाले असावे असा दाट संशय त्यांच्या पत्नी आणि मुलांनी व्यक्त केला आहे.