Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरAshok Dhodi Case: मुख्य आरोपी अविनाश धोडी अजूनही फरार

Ashok Dhodi Case: मुख्य आरोपी अविनाश धोडी अजूनही फरार

Subscribe

मुख्य आरोपीच्या मुसक्या लवकरात लवकर आवळल्या जाव्यात, अन्यथा कुटुंबीय उपोषणाला बसतील. पालघर जिल्हा परिषदेत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनता दरबारात कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महेश भोये, डहाणू : अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला महिना उलटून गेला असला तरी मुख्य आरोपी अविनाश धोडी अद्यापही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. पोलिसांनी स्थापन केलेल्या स्थानिक गुन्हे शाखेसह आठ पथकांचा तपास सुरू असला तरी आरोपी सतत पोलिसांना चकवा देत आहे. मयत अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, मुख्य आरोपीच्या मुसक्या लवकरात लवकर आवळल्या जाव्यात, अन्यथा कुटुंबीय उपोषणाला बसतील. पालघर जिल्हा परिषदेत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनता दरबारात कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मागील दोन दिवसांपूर्वी मयत अशोक धोडी यांचा मुलगा अमर धोडी यांच्यावर काळ्या काचांची कार वापरून जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र, घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार २१ फेब्रुवारी रोजी सदर कार चालक इसमास घोलवड पोलीस ठाण्यात हजर केले असता पोलीस तपासात त्या कार चालकाचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेबद्दल पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि घोलवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक साहेबराव कचरे यांना विचारणा केली असता दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना यामध्ये कुठलाही घातपाताचा कट नसल्याचे याबाबत तपासात निष्पन्न झालेली माहिती मिळाली. तथापि, मयत अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा दावा आहे की मुख्य आरोपी अविनाश धोडी पालघर जिल्ह्यात मुक्त संचार करत आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी सांगितले (मयत अशोक धोडींचा मुलगा आकाश धोडी व पत्नी)
“मोकाट फिरणार्‍या अविनाश धोडीला लवकरात लवकर पकडावे, अन्यथा गावातील लोकांना, नातेवाईकांना किंवा आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जर लवकरच कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील त्यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भरवण्यात आलेल्या जनता दरबार येथे पोलीस प्रशासनाला दिला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीच्या अटकेसाठी पोलीस प्रशासन किती लवकर यशस्वी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar