डहाणू: शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तब्बल 11 दिवसानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला. तसेच त्यांची गायब झालेली कारही सापडली आहे.त्यापूर्वी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.परंतु,या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश धोडी, जो मृत अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ आहे, तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अशोक धोडी अपहरण प्रकरणी त्यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडीलाही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पोलीस चौकशीदरम्यान लघुशंकेचा बहाणा करत अविनाश धोडी हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. संशयित आरोपी अविनाश धोडी फरार झाल्याने पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.
धोडी यांची हत्या करून त्यांना कार सकट गुजरातच्या एका बंद पडलेल्या खदानीत फेकून देण्यात आले होते. पण सेन्सरचा एक मायक्रो तुकडा सापडला आणि या खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी या तुकड्यावरून थेट गुजरातला जाऊन धोडी यांचा मृतदेह ताब्यात घेतला. अशोक धोडी आणि मुख्य सूत्रधार आरोपी अविनाश धोडी यांचा मागील काही वर्षांपासून घरपट्टी आणि दारू तस्करीवरून कौटुंबिक वाद होता,अशी माहिती आहे. आरोपी अविनाश धोडी याचा दमन आणि दादरा नगर हवेली येथील दारू अवैधरित्या महाराष्ट्रात आणून विकण्याचा व्यवसाय होता. अशोक धोडी यांनी या विरोधात अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे अशोक यांची अडचण ठरत असल्याने आरोपीने अनेकवेळा अशोक धोडींवर हल्लेही घडवून आणल्याचे समोर आले आहे.तसेच हत्या करण्यापूर्वी आरोपींनी अशोक धोडी यांचे घर, गाडी आणि गुजरातच्या सारिग्राममधील बंद पडलेल्या दगड खदानीची रेकी केली होती,अशी देखील माहिती आहे.
मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्या तपासासाठी विविध राज्यांत आठ पथके नेमलेली आहेत.या आरोपीला लवकरात लवकर शोधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– बाळासाहेब पाटील,पोलीस अधिक्षक,पालघर
Edited By Roshan Chinchwalkar