Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरवसईत केळी पिकवण्यासाठी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर

वसईत केळी पिकवण्यासाठी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर

Subscribe

केळी पिकवण्यासाठी इथिलीन नावाचा गॅस वापरला जात आहे. हा गॅस वापरण्याचे एक प्रमाण प्रशासनाने ठरवून दिले आहे. पण जलद गतीने केळी पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या गॅसचा वापर सर्रास केला जातो.

विरार : वसई -विरार परिसरात खाद्य पदार्थांच्या भेसळीने कळस गाठला आहे. आधी बनावट पनीर, दही, मिठाई यांचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे वसईतील खाद्य कारखाने हे लोकांच्या जीवाशी खेळ करत खाद्य निर्मिती करत असताना अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याने राजरोसपणे खाद्य माफिया नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. नालासोपार्‍यात असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे, ज्या केळींसाठी वसई सुप्रसिद्ध आहे. तीच केळी आता रासायनिक पद्धतीने पिकवली जात असल्याने त्याची गुणवत्ता आणि दर्जा घसरला आहे. कमालीच्या अस्वच्छतेत ही केळी कृत्रिम रित्या पिकवली जात आहेत. केळी पिकवण्यासाठी इथिलीन नावाचा गॅस वापरला जात आहे. हा गॅस वापरण्याचे एक प्रमाण प्रशासनाने ठरवून दिले आहे. पण जलद गतीने केळी पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या गॅसचा वापर सर्रास केला जातो. ( Bananas are grown chemically in the vasai )

साधारणता या गॅसने केळी पिकण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. पण जास्त प्रमाणत वापर केल्याने केवळ एक ते दोन दिवसांतच केळी तयार केली जातात.जास्त प्रमाणात इथेलीन गॅसचा वापर करून तयार केलेली केळी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. सदराची पिकवलेली केळी वसई विरार, नायगाव, भाईंदर आणि मुंबईतही काही ठकाणी बाजारपेठेत पाठवली जातात. साधारणत: एका वखारीत १०० ते १५० पेट्या एका शितबंद पेटीत ठेवल्या जातात. त्यावर इथिलीन नावाच्या गॅसची फवारणी केली जाते. शीतगृहात १३ ते १५ डिग्री सें. तापमानाखाली शीतगृह तीन ते चार दिवसांतही बंद करून ठेवले जाते. त्यावर निगराणी ठेवली जाते. साधारणत: १ ते २ टन फळांसाठी केवळ ७ ते ८ ग्राम इथिलीनचा वापर केला जाऊ शकतो. याहून अधिक वापरणे हे धोकादायक आहे. वसई -विरारमध्ये ७० हून अधिक केळी वखारी आहेत.

या वखारींची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असतानाही अजून एकदाही स्थानिक प्रशासन अथवा अन्न व औषध प्रशासन विभागाने पाहणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ वसई- विरारमध्ये फोफावत आहे. इथिलीनचा योग्य प्रमाणात वापर केल्यास कोणताही धोका नाही. पण अधिक प्रमाणात वापर झाल्यास ती फळे आरोग्यास धोकादायक ठरू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात मिठाई सोबतच फळांची विक्री होत असते. यामुळे दुकानदार अशा पद्धतीने फळ पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. यावर अन्न औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar