भाईंदर : मीरा –भाईंदर शहरातील एस.टी बस स्थानकातून मंगळवार सायंकाळपासून भाईंदर– नाटे, भाईंदर– जळगाव व भाईंदर – कोल्हापूर यातीन मार्गांवर नव्याने एसटी बस फेर्यांची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मीरा भाईंदर शहरातील मराठा व्यवसाय संघ (कोकण विभाग ), खान्देशी सेवा संघाच्या मार्फत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानण्यात आले आहेत.मीरा– भाईंदर शहरातील अनेकांनी त्याच्याकडे गावी जाण्यासाठी मीरा –भाईंदर शहरातून एसटी बस सुरु करण्याची मागणी केली होती. याबाबत पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. शहरातून नागरिकांना एसटीने प्रवास करणे सोयीस्कर पडावे व त्यांना प्रवास करण्या करता दुसरीकडे जावे लागू नये याकरता सर्वांच्या मागणीची दखल घेत सरनाईक यांनी सुरूवातीला तीन मार्गांवर बस फेर्या सुरु केल्या आहेत.
त्यात सुरवातीला भाईंदर– नाटे (सायं ७.३० ला ), भाईंदर– जळगाव (रात्री ९.०० ला ) व भाईंदर – कोल्हापूर (रात्री १० ला ) अशा वेळांवर बसेस सुटणार आहेत. एसटी बस सेवा सुरु झाल्याने शहरातील लोकांना आनंद झाला आहे. यापूर्वी मीरा –भाईंंदर शहरातील लोकांना प्रवास करण्या करता बोरिवली अथवा ठाण्यात एसटी करता जावे लागत होते. मीरा–भाईंदर शहरातील मराठा व्यवसाय संघ (कोकण विभाग ) व ), खान्देशी सेवा संघ यांच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेटू घेऊन त्यांना निवेदन देत भाईंदर मधून कोकणात, जळगावला जाण्यासाठी एसटी बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यात कोकण विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शासनाने फलोत्पादन जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे. या जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ म्हणून आंबा यांना जीआय टॅग सुद्धा दिलेले आहेत. कोकणातील बहुतांश व्यवसाय हे कोकणी मेवा आणि मत्स्य शेती सोबत निगडित आहेत. मीरा–भाईंदर या शहरात कोकणातील कोकणी बंधू– भगिनी खूप मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी राहतात. भाईंदर ते रत्नागिरी, गणपतीपुळे, साखरपा, मालवण अशी कायमस्वरूपी एसटी बस चालू करण्यात यावी जेणेकरून कोकणातील मालवाहतुकीला चालना मिळेल, याकरिता देखील परिवहन मंत्री यांना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे.