Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरवातावरणातील बदल आरोग्यास हानिकारक

वातावरणातील बदल आरोग्यास हानिकारक

Subscribe

जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज ओपीडीमध्ये चारशेच्या आसपास रुग्ण हे सर्दी, खोकला व तापाचे असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर खासगी रुग्णालयातदेखील या आजाराचे रुग्ण आहेत.

जव्हार: जव्हार शहर तथा तालुका परिसरात काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. तापमानाचा पारा आता २३ ते ३२ अंशांवर गेला आहे. यामुळे कडक उन्हाचे चटके बसत आहेत. मात्र, दुपारी ऊन आणि रात्री हवेत गारवा जाणवत असल्याने घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. वातावरणात वेळोवेळी बदल होत आहे. दुपारी ऊन अन् सायंकाळी व रात्री हवेत गारवा निर्माण होत आहे. यामुळे बालकांसह वयोवृद्धांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्दी, खोकला, थंडी, ताप,अंगदुखी, घसा खवखवणे आदी आजार प्रामुख्याने सर्वत्र दिसून येत आहेत. त्यामुळे खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज ओपीडीमध्ये चारशेच्या आसपास रुग्ण हे सर्दी, खोकला व तापाचे असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर खासगी रुग्णालयातदेखील या आजाराचे रुग्ण आहेत.

वातावरणात होणारे बदल, बदलते तापमान हे व्हायरल इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. पाच वर्षांच्या आतील बालक, वृद्ध व्यक्ती यांना रोगांची अधिक लक्षणे आढळत आहेत. अशावेळी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. व्हायरलची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

**लहान मुलांची काय काळजी घ्याल**
लहान मुलांमध्ये वातावरणातील बदलामुळे ताप, थंडी, सर्दी, खोकला यांसारखे आजार बळावतात. त्यामुळे आइस्क्रीम, जंकफूड, तळलेले व शिळे पदार्थ; तसेच फ्रीजमध्ये ठेवून असलेले अन्न मुलांना खायला देणे टाळावे. शिवाय नियमित कोमट पाणी पिण्यास द्यावे. अतिथंड पदार्थांचे सेवन करणे या काळात टाळावे.

जव्हार शहरात सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे. तसेच उपचार घेण्यासाठी जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात देखील ओपीडीत व्हायरल रुग्ण दाखल होत आहेत. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे व्हायरलचा त्रास होत आहे. जसजसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरूवात होईल, तसतसे व्हायरलचे रुग्ण कमी होण्यास मदत होईल.

डॉ. संजय कावळे, प्रभारी, वैद्यकीय अधीक्षक, पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय जव्हार


Edited By Roshan Chinchwalkar