Homeमहामुंबईपालघरमृत प्राण्यांच्या दफनभूमी प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांची परवानगी

मृत प्राण्यांच्या दफनभूमी प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांची परवानगी

Subscribe

याबाबत केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडे पत्रव्यवहार करून वसई विरार शहरातील मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीची समस्या मांडली होती. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या होत्या.

वसई : वसई- विरार शहरात मृत झालेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी दफनभूमी नसल्याने त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या विल्हेवाट करण्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांची परवानगी मिळाली असल्याने लवकरच क्षेपणभूमी जवळ दफनभूमी तयार करून विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात दफनभूमी नसल्याने विल्हेवाट लावण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने दफनभूमी उभारावी अशी मागणी ही नागरिकांमधून करण्यात येत होती.सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडे पत्रव्यवहार करून वसई विरार शहरातील मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीची समस्या मांडली होती. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या होत्या.

या सुचनेनंतर महापालिकेने गोखीवरे येथील क्षेपणभूमी जवळील भागात दफनभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी मृत प्राण्यांची विल्हेवाट लावता यावी असा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी स्तरावर पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावास जिल्हाधिकारी स्तरांवरून परवानगी मिळाली असल्याने जनावरांच्या विल्हेवाट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच त्या ठिकाणी दफनभूमी उभारून मृत जनावरांची विल्हेवाट करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती पालिकेने दिली आहे.शहरात पाळीव प्राण्यांबरोबरच अनेक बेवारस प्राणी विविध आजारांमुळे किंवा अपघातामुळे मृत्युमुखी पडतात. त्यांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असतात. शहरात सद्यस्थितीत विविध भागात मृत होऊन पडणार्‍या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे.


Edited By Roshan Chinchwalkar