भाईंदर : मिरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांच्या आदेशानंतर पालिका हद्दीत पर्यावरणाचा ह्रास करणार्या पाच बांधकाम प्रकल्पांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगररचनाकार पुरुषोत्तम शिंदे यांच्याकडून प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांची स्थळपाहणी करण्यात आली होती. त्यात दोषी असलेले मौजे घोडबंदर येथील सर्व्हे क्रं. १५१ हिस्सा क्रं. १, २ विकासक अजय विजय बहादूर यादव, मौजे नवघर सर्व्हे क्रं. ८२ (२७१) हिस्सा क्रं. ८, ९, १०, ११ व ८५ (२८६) १, २ चे विकासक मे. रश्मी प्रॉपर्टीजचे प्रो. प्रा. हेमेंद्र पी. बोसमिया, ओस्तवाल बिल्डर्स लिमिटेडचे संचालक उमरावसिंह ओस्तवाल, मौजे गोडदेव, भाईंदर येथील सर्व्हे क्रं. ३६५ (७१)/ ६पै., १२, १४ ते २० व मौजे भाईंदर येथील सर्व्हे क्रं. ३६४(६७)/४ ब, ४८७(८७)/ १पै., ५,६,७ विकासक मे.ओस्तवाल बिल्डर्स लि., व मौजे घोडबंदर, सर्व्हे क्रं. १३५/१, २, १३६/६, १४७/१, २, ३, १४८/ ३,४, ७, १४९/ १, ३, ५, ६, ७ अ, २२२/२ चे विकासक मे. पी एन के डेव्हलपर्स आणि मौजे भाईंदर, सर्व्हे क्रं. २०७ (५५९) / ३, १६५ (५६०)/ १पै., २ चे विकासक मे. स्पॅन क्रिओटर्स यांना बांधकाम थांबवण्याचे आदेश १७ जानेवारी रोजी पारित केले आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे, मिरा -भाईंदरच्या हवेची गुणवत्ता ढासळली असून दूषित वातावरणात श्वास घेणेही मुश्कील झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये हवेची पातळी १५० एक्यूआय होती तर त्यापेक्षा असलेली गुणवत्तेची पातळी अतिखराब मानली जाते. गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयाने वाढत्या प्रदूषणाची स्वतःहून दखल घेत प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश देत तात्काळ हवा प्रदूषण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर खरेदी करण्याचा सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने याची दखल घेत प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना आणि नियम केले. परंतु मीरा-भाईंदरमध्ये सातत्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. शहरातील कोणत्याही बांधकामाच्या ठिकाणी विहित नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे.
नवीन इमारती बांधकामाच्या ठिकाणी उपाय व खबरदारी
नवीन इमारत बांधकाम होत असलेल्या किंवा ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्र्याचे आच्छादन असणे, एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे आच्छादन किंवा कापडांचे आच्छादन असावे, इमारतीच्या बांधकामांना हिरवे कापड झाकून बंदिस्त करणे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत. त्यासोबत येताना जाताना त्या वाहनांच्या टायरावर पाणी मारून चिखल बाहेर रस्त्यांवर जाणार नाही याची खबरदारी घेणे. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत आदी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्यास अशा इमारती व गृह निर्माण प्रकल्पांना नोटिसा बजावून काम बंद ठेवणे अपेक्षित आहे.
शहरात ज्या ज्याठिकाणी पर्यावरणाचा ह्रास करून हवा प्रदूषण करणारे बांधकाम प्रकल्प असतील किंवा आरएमसी प्लांट तसेच नवीन इमारती बनविताना खोदकाम करून वाहतूक करणार्या गाड्या असतील ,ज्यामुळे रस्ते घाण होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. हवा प्रदूषण करणार्या १५ विकासकांना नोटिसा देऊन खुलासा मागवला व त्या प्रकल्पाची इंजिनीयर सोबत जाऊन स्थळपाहणी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्या पाच बांधकाम प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. तसेच अजून नियमांचे उल्लंघन करणार्या विकासकांना काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
– पुरुषोत्तम शिंदे, सहायक संचालक, नगररचना