भाईंदर : मिरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर विषयक जनजागृती मोहिमेकरिता सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर आणि पोलीस उप निरीक्षक प्रसाद शेनोलकर यांना ’बालस्नेही पुरस्कार’ २०२४ प्रदान करण्यात आला आहे. राज्यातील बालकांच्या सर्वांगिण विकास, बाल विकास हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा व आरोग्य इत्यादी अनेक महत्वपूर्ण विषयांवर अनेक प्रशासकीय यंत्रणा तसेच इतर संस्था सकारात्मक पध्दतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेत. अशा व्यक्तींना,संस्थांना त्यांच्या कार्याकरता ’बालस्नेही पुरस्कार’ या पुरस्काने सन्मानित करण्यात येते. सन २०२४ च्या पुरस्काराकरिता पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांना उत्कृष्ट पोलीस निरीक्षक व उत्कृष्ट पोलीस उपनिरीक्षक या नामांकन प्रकारात बालस्नेही पुरस्कार मंत्री महिला व बाल विकास विभाग आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुश्री बेन शाह, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबईच्या अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे.
पोलीस आयुक्तालयामध्ये सायबर विषयक जनजागृती मोहिम राबविण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या प्रमाणे सन २०२३ मध्ये एकूण २२ आणि सन २०२४ मध्ये एकूण ४२ शाळा आणि महाविद्यालये तसेच गणपती मंडळे, नवरात्री मंडळे, रहिवाशी सोसायटी, संस्था कार्यालये, धार्मिक स्थळ (चर्च) अशा विविध ठिकाणी सायबर विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला, लहान मुले, तरुण पिढी यांच्याकडून सोशल मिडीया, इंटरनेटचा वापर होत असताना काय खबरदारी घ्यावी याबाबत योग्य व सविस्तर माहिती सायबर पोलीस ठाणे यांच्याकडून वेळोवेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये देण्यात आली. तसेच सायबर विषयक जनजागृती करीता राबविण्यात आलेली इंस्टाग्राम रिल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा या सारख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. बालस्नेही पुरस्कार या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनिषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत आदी उपस्थित होते.