डहाणू: कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा धापशीपाडा येथे एका महिलेची तिच्याच पतीने घरगुती वादातून गंभीर मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास गुलाब सुरेश भोईर (वय 52) हिला तिचा नवरा सुरेश रामा भोईर (वय 58) याने घरगुती कारणावरून भांडण करत मारहाण केली. फिर्यादी रामदास सुरेश भोईर (वय 31) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पीडित महिलेला घरातून बाहेर जाण्याचे कारण विचारले आणि त्यानंतर तिला थप्पड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे, तर आरोपीने हातात दगड घेऊन पत्नीच्या डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात महिलेस गंभीर दुखापती झाल्या आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेवेळी फिर्यादी आणि इतरांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांनाही मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 103(1) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा क्रमांक 32/2025 प्रमाणे कासा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचा पोस्टमार्टम अहवाल प्राप्त झाला असून पुढील तपास कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांदळे आणि पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहेत. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंपळे, तसेच कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांदळे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.