Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरदिवसेंदिवस मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाताचा धोका वाढतोय

दिवसेंदिवस मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाताचा धोका वाढतोय

Subscribe

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरु करताना थातूरमातुर उपाययोजना करून वाहन चालकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे.

वसई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. हा महामार्ग जीवघेणा ठरू लागला आहे. वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात आलेला असतानाही महामार्गावर अपघातांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. ठेकेदाराकडून महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने अपघातांसह बळींची संख्या वाढत आहे. गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. सहा दिवसांपूर्वी मुंबई -अहमदाबाद महामार्गावर निर्माणाधीन असलेल्या सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवरील डांबरमिश्रित खडीवर दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात अज्ञात ट्रकखाली चिरडून दुचाकीवरील दांपत्याचा मृत्यू झाला.

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरु करताना थातूरमातुर उपाययोजना करून वाहन चालकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघाताला पुलाची उभारणी करणारा ठेकेदार जबादार असल्याचा आरोप होत आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करताना नवीन डांबरी सर्व्हिस रोड तयार करण्याऐवजी ठेकेदाराने व्हाईट टॉपिंग दरम्यान निघालेली डांबर मिश्रित खडी टाकून सर्व्हिस रोड तयार केला होता. सर्व्हिस रोडवर टाकलेल्या खडीवर दुचाकी घसरल्याने अपघात झाला होता.त्याच प्रमाणे हालोली पाटील पाडा भागात भिवंडीकर ढाब्या समोर महामार्गाच्या गुजरात वाहिनीचे काम अपूर्ण आहे.भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधीत पूर्ण झाला आहे. परंतु महामार्गाच्या तिसर्‍या मार्गीकेच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. दोन मार्गीका असल्यामुळे रस्ता अरुंद असून त्याच भागातील नाल्यावर पुलाचा कठडा आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहने एकावेळी जाऊ शकत असताना वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नाहीत,अशी तक्रार आहे. दरम्यान मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे वाहनचालक चांगलेच धास्तावले असल्याचे मत नागरिक वर्तवत आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar