डहाणू : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बससेवेची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, जीर्ण बसेस आणि अपुर्या मनुष्यबळामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परवडणारी वाहतूक सेवा असल्याने एस.टी. बसचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला, तरी वेळोवेळी देखभाल न झाल्यामुळे या बसेस जीवघेण्या ठरत आहेत. बससेवेच्या अव्यवस्थेमुळे अनेक बसेस ठरलेल्या वेळेनुसार सुटत नाहीत. प्रवासादरम्यान बस पंक्चर होणे, ब्रेकडाऊन होणे यांसारख्या घटनांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे.
सध्या डहाणू बस डेपोत ४३ बसेस कार्यरत आहेत. यामध्ये १२ लांब पल्ल्याच्या आणि २ मध्यम पल्ल्याच्या बसेसचा समावेश आहे. मात्र, प्रतिदिन १८० कर्मचार्यांची आवश्यकता असताना, येथे केवळ १४२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे ३८ कर्मचार्यांची कमतरता जाणवत असून, बसेस वेळेवर न सुटणे आणि देखभालीअभावी वारंवार बिघाड होणे या समस्या उद्भवत आहेत. अनेक बसेसची अवस्था खूपच वाईट आहे. तुटलेल्या काचा, खिडक्या, दरवाजे आणि वरून गळक्या बसेसमुळे प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एस.टी. ही जीवनवाहिनीच आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने तातडीने नवीन बसेस पुरवाव्यात आणि सेवा वेळेवर उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.
“ग्रामीण भागातील प्रवासी अजूनही परवडणार्या एस.टी. सेवेवर अवलंबून आहेत. मात्र, बसेस वेळेवर न सुटणे आणि खराब स्थितीमुळे विद्यार्थ्यांना आणि कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परिवहन महामंडळाने यात लक्ष घालून बसेसची स्थिती सुधारावी.”
– मनोज सातवी, विद्यार्थी.
“सध्या डहाणू बस डेपोत ४३ बसेस आहेत. मात्र, अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. दहा ते बारा नवीन बसेसची आवश्यकता असून, त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे. कर्मचार्यांची देखील कमतरता भासत आहे.”
– राजू पाटील, बस व्यवस्थापन अधिकारी, डहाणू
Edited By Roshan Chinchwalkar