भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला नवघर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 6 लाख 90 हजार रूपयांचा गांजा हा अंमली पदार्थ पकडला आहे. त्यानंतर एकूण 23 बॉक्स व वजन 46 किलो इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्यात एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मिरा -भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नवघर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार शुक्रवारी गस्त करत असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास जेसल पार्क चौपाटीकडे जाणार्या रेल्वे स्टेशन लगतच्या रस्त्याजवळ त्यांना सहा व्यक्ती हातामध्ये 3 प्रवासी ट्राली बॅग घेऊन उभे असलेले दिसून आले. सहा जण संशयीतरीत्या उभे असताना दिसून आल्याने व काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांच्या जवळ गेल्यावर उग्रवास आल्याने त्याच्याकडे अमंलीपदार्थ असल्याचा पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी त्यांना आणि बॅगांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणत बॅग उघडून तपासणी केली असता त्यात गांजा नामक अंमली पदार्थ मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रमोदकुमार श्यामलालसिंह कुरवाह , बनमाली नंदिया प्रधान, कान्हा सुदर्शन परीदा, विकास हरस खुणटिया,शिपु भास्कर स्वाईन, राजा संतोष स्वाईन यांना अटक केली आहे. सदरची कारवाई ही मिरा -भाईंदरचे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी, पोलीस निरीक्षक मुकुंद यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार संतोष पाटील, भुषण पाटील, सुरेश चव्हाण, जयप्रकाश जाधव, पोलीस शिपाई मुकेश निकम, सुरजसिंग घुनावत, संकेत मगर, नवनाथ पवार, उमेश अस्वार तसेच मसुबचे कुणाल हिवाळे यांनी केली आहे.