डहाणू : पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून कासा पोलिसांनी चारोटीनाका येथे २५ लाख रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले आहे.कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक महामार्गावर गस्त घालत असताना चारोटी उड्डाणपुलाजवळ एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जात असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर चारोटी कोस्टल चौकीत नेऊन पंचांच्या उपस्थितीत त्याची व बॅगेची झडती घेतली असता, कपड्यांमध्ये लपवलेले, सफेद कागदात सेलोटेपने गुंडाळलेले एक पुडके आढळले.( Drugs: MD drugs worth 25 lakh seized at Charotinaka )
अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अमली पदार्थ तपासणी किट मागवण्यात आले. प्रशिक्षित अंमलदार पो. हवा सूर्यवंशी यांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता, सदर पुडक्यात एमडी असल्याचे स्पष्ट झाले. वजन केल्यानंतर सुमारे १२५ ग्रॅम एमडी आढळले, ज्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे २५ लाख रुपये आहे. संशयित आरोपी राज बाबन शेअल (वय २६, रा. बांद्रा, मुंबई) यास ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत तो अहमदाबादहून मुंबईकडे जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी उतरल्याची माहिती मिळाली आहे. सदर आरोपीविरुद्ध कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, उपनिरीक्षक किशोर पवार, तसेच पोलीस कर्मचारी रंजीत वसावला, संदीप चव्हाण, रवी चौधरी, एस. सय्यद यांनी सहभाग घेतला.