मनोर: शिक्षकांना मानधनासाठी शासन निधी देत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून पालघर जिल्ह्याच्या आदिवासी बहुल भारोळ आणि पेल्हार जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग बंद केले आहेत.जिल्हा परिषदेने वर्ग बंद करून 142 विद्यार्थ्यांचे समायोजन पंधरा किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.विद्यार्थ्यांची रवानगी चांदीप आणि खानीवडे येथील शाळांमध्ये करण्यात आली आहे.वर्ग बंद करण्याचा निर्णय घेताना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि शिक्षण सभापतींना अंधारात ठेवल्याचा आरोप होत आहे.वसईच्या गटशिक्षणाधिकार्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी काढले होते. दरम्यान वर्ग बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन केल्याचा अहवाल सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाला नसल्याचे समोर आले आहे.तर बंद केलेले वर्ग पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार विहित अंतरावर माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्यामुळे पुढच्या वर्गात प्रवेशाअभावी विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये, यासाठी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडून 41 शाळांमध्ये सुरु केलेल्या इयत्ता नववी – दहावीचे वर्गांमध्ये ७ हजार 358 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची पदे मंजूर झालेली नसल्यामुळे नेमणूक केलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून मानधन दिले जात आहे.मानधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करुनही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत माध्यमिक शाळा सुरु ठेवण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे.
शिक्षकांना मानधन देण्यासाठी शासन स्तरावरून पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकार्यांना दिले होते.वर्ग बंद करण्याचा निर्णय रद्द करून वर्ग पुन्हा सुरु करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाने काढलेल्या पत्राबाबत आम्हाला माहिती नव्हती.
– प्रकाश निकम, अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर.
शाळा व्यवस्थापन समिती सोबत बैठक घेऊन वर्ग बंद करण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकार्यांना दिले होते.वर्ग बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन केल्याचा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही.
– संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद,पालघर
Edited By Roshan Chinchwalkar