भाईंदर : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन-चौक या ठिकाणी असलेल्या डोंगरावर ऐतिहासिक वारसा लाभलेला धारावी किल्ला आहे. या किल्ल्यावर हिंद सागर फाउंडेशन या संस्थे कडून रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. किल्ल्याची स्वच्छ्ता करत असताना परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या बिअर व दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या किल्ल्याची देखभाल करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, किल्ला परिसरात मद्यपान करणार्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागात बांधलेला जंजिरे धारावी किल्ला हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी यांचा ऐतिहासिक वारसा आणि मराठा योद्धा चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. हा वारसा महाराष्ट्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केला आहे. हे ऐतिहासिक ठिकाण सध्या मिरा -भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीत आहे. महापालिकेने या किल्ल्याची देखभाल व सुरक्षा करणे आवश्यक आहे. महापालिकेने किल्ला परिसरात सुरक्षा कर्मचारी नेमलेले आहेत. तरीही असे प्रकार घडत असल्याने महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
जंजिरे -धारावी किल्ल्यावर हिंद सागर फाउंडेशन या संस्थेने स्वच्छता मोहिम राबवून प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा गोळा करून किल्ला स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने फाउंडेशनचे संस्थापक चतुर्भुजा पांडे, कार्याध्यक्ष वेदप्रकाश तिवारी, सदस्य पंकज मिश्रा, वीरेंद्र विष्ट, शुभम दुबे, अमित शुक्ला, रोहित यादव, जतीन शर्मा आदींनी सहभाग घेतला. हा किल्ला गौरवशाली इतिहासाचा ठेवा असून येणार्या नव्या पिढीला या वारशाची ओळख करून द्यायची असेल तर त्याचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे पांडे यांनी सांगितले.