भाईंदर :- मिरारोड येथील लता मंगेशकर नाट्यगृहाजवळ असलेल्या सुविधा भूखंडावर बांधण्यात आलेले आणि महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या सहाय्याने पालिका जनतेसाठी कॅशलेस रूग्णालय सुरू करणार असून त्याचे लोकार्पण पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मीरा -भाईंदर शहरातील गरजू रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य व्हाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मातोश्रीच्या नावे मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय मीरा रोड येथील लता मंगेशकर नाट्यगृहाजवळ उभारण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी २३ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रूग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व उपचार, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, व्हॉल्व्ह बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सर वरील उपचार पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेतून येथे मोफत होणार आहेत.
महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या इमारतीचे काम ९० टक्के झाले असून १५ जानेवारीपर्यंत सर्व काम पूर्ण होईल. रुग्णालयाची इमारत कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेला बांधून मिळाली आहे. रुग्णालयाला लागणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी २५ कोटी विशेष निधी मंजूर करून आणला. यात महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. रुग्णालयाचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चालणार आहे.