भाईंदर : उत्तराखंड राज्यातून येऊन मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वयोवृध्द महिलांना गाठून त्यांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणार्या चार जणांना मध्यवर्ती गुन्हे कक्षाने रेल्वेने पळून जाताना गांधीनगर, गुजरात येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १७ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भाईंदर पूर्वेच्या काशीनगर परिसरात राहणार्या दिनाक्षी पाटील ( ५० ) या २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुकानातून सामान घेवून घरी पायी जात असताना आरोपीने त्यांना बोलण्यात गुंतवून आणि दिशाभूल करुन हात चलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील सोन्याची फुले पिशवीत घालण्यास सांगून फसवणूक केली.तसेच आरोपी सोन्याचे दागिने घेवून पळून गेले.
याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे पोलीस पथकाने गुन्हयाच्या घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज पडताळणी केली.त्यानंतर आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर आरोपी हे गुन्हा केल्यानंतर रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे पोलीस पथकाने रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने आरोपी आयुब कलुवा हसन (२६ ), फारुखअली लोहरी शाह (३४ ), नौशाद अलीमुद्दीन हसन (२८ ), जलालुद्दीन लोहरी शाह (४५ ) सर्व रा. उधमसिंग नगर, उत्तराखंड यांना गांधीनगर रेल्वे स्टेशन, गुजरात येथून गुरूवारी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही सदरची कारवाई ही गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, प्रशांत गांगुर्डे, नितीन बेद्रे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार संतोष मदने, शिवाजी पाटील, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविंद केंद्रे, विकास राजपुत, संदिप शेरमाळे, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, रविंद्र कांबळे, नितीन राठोड, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, मसुब सचिन चौधरी तसेच सहा. पोलीस आयुक्त संजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुमेर सिंग, पोलीस हवालदार मोगल नेमणुक रेल्वे सुरक्षा बल, गांधीनगर, गुजरात यांनी केलेली आहे.