भाईंदर : काशीमीरा परिसरात आणि इतर ठिकाणी बसमध्ये चढणार्या प्रवाशांची अडवणूक करून त्यांच्याकडील मोबाईल फोन चोरी करणार्या टोळीला काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. अटक आरोपींकडून १३ मोबाईल आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बसमधील प्रवाशांचे मोबाईल फोन जबरी चोरी करून चोरून नेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाईल चोरांची टोळी दररोज बसमध्ये चढणार्या प्रवाशांचे मोबाईल चोरत होते. अनेक लोक तक्रार करतात तर काही जण तक्रार देखील करत नाहीत. मोबाईल चोरीच्या घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून आरोपीचा शोध घेवून त्यास पायबंद करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
काशिमिरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करत असताना एका कारमध्ये बसलेले ६ इसमांच्या हालचाली संशयास्पदरित्या दिसल्या. त्यांना ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण १२ मोबाईल फोन मिळून आले. मिळून आलेल्या मोबाईल फोनची पडताळणी करता त्यापैकी एक मोबाईल हा दाखल असलेल्या गुन्हयातील चोरीस गेलेला असल्याचे आढळून आले. याप्रकरणी आरोपी अन्वर गफुर सय्यद, समीर बशीर अन्सारी ऊर्फ बचकाना, मोहम्मद अफजल मोहम्मद वजीर शेख, सलीम अब्दुल रहमान शेख, अफरोज अहमद शेख, मोहम्मद सुलतान अब्दुल कय्युम खान ऊर्फ लाला हे (सर्व रा. मुंब्रा)यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १२ मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन मिळून आले. एकूण ३ लाख १ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींकडे केलेल्या तपासादरम्यान त्यांच्यावर काशिमिरा पोलीस ठाणे ३ गुन्हे, दहिसर पोलीस ठाणे, मुंबई २ गुन्हे व एक कासारवडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे हे करत आहेत.