सफाळे: एका 50 वर्षीय महिलेची ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार मंगळवार 6 जुन रोजी पहाटेच्या सुमारास सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील मांडे गावात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. पद्मा बहादुरसिंग बिक (वय 50 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून ती माकणे येथील 9 स्टार लेडमार्क या इमारतीत राहणारी असून मूळची नेपाळ येथील रहिवाशी होती.
सोमवार 5 जुन रोजी संध्याकाळी ही महिला काही कामानिमित्त माकणे नाक्यावर गेली मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही. सदर महिला घरी आली नसल्याने घरच्यांनी रात्रभर तिचा शोध सुरू केला . मात्र तिचा कुठेच तपास लागला नाही. अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारात मौजे मांडे गावाच्या हद्दीतील मुजबादेवी मंदिराच्या समोरील रस्त्याच्या पलीकडे असलेल्या प्रसन्न हरीश ठाकूर यांच्या शेतात हत्या केलेल्या अवस्थेत पद्मा हीचा मृतदेह स्थानिकांना आढळला.
याप्रकरणी सदर महिलेचा मुलगा मदन बहादुरर्सिंग बिक ( वय 32 वर्ष) याने सफाळे पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाची पाहणी केली असता, महिलेला चेह-यावर घाव घातला असल्याचे दिसून आले तसेच तिच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळून तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. तसेच महिलेच्या गळ्यात सोन्याची चैन, कानातील झुमके व मोबाईल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
मात्र असा कुठलाही ऐवज मृतदेहाजवळ आढळून आला नाही. पोलिसांनी घटनास्थळी दुरवर पाहणी केली असता त्या महिलेची चप्पल, रिकामे पाकिट व एका पिशवीत दारुची बाटली आढळून आली. याबाबत घटनास्थळी पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी व सफाळे पोलिसांनी पोहचून पंचनामा केला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेवून सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या गुन्ह्याप्रकरणी सफाळे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात भादवी कलम 302,201 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी अज्ञात आरोपीचा तपास करीत आहेत.