Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरHoli 2025: शहरात पाचशेहून अधिक सार्वजनिक ठिकाणी होळीचे आयोजन

Holi 2025: शहरात पाचशेहून अधिक सार्वजनिक ठिकाणी होळीचे आयोजन

Subscribe

सदर वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस दल सतर्क असणार असल्याचे पोलीस आयुक्तलयाकडून सांगण्यात आले आहे.

भाईंदर : मिरा- भाईंदर शहरात सार्वजनिक ठिकाणी एकूण ५८६ आणि खासगी ठिकाणी ११९१ होळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या मार्फत देण्यात आली आहे. होळी आणि धुलिवंदन दिवशी मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन देखील पोलिसांच्या मार्फत करण्यात आले आहे. जर तसे केल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. होळी हा सण पारंपरिक असल्यामुळे तो सण महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने होळीचा सण साजरा करत असतो. मिरा- भाईंदर शहरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. सदर वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस दल सतर्क असणार असल्याचे पोलीस आयुक्तलयाकडून सांगण्यात आले आहे.

होळीचा सन शांततेत पार पाडावा याकरिता अनेक उपाय योजना देखील राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आयुक्तलयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे त्यांच्या हद्दीत होळी सणाचे आयोजन करणार्‍या सर्वांना एकत्र बोलावत होळी व धुलीवंदन सण शांततेत पार पडण्या संदर्भात आयोजकांची बैठक घेत आहेत. त्याच बरोबर होळी व धुलीवंदन सणाकरीत शहरात आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात ४२ पोलीस निरीक्षक, १४५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७२३ पोलीस अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १३१ जवान, १५२ होमगार्ड, दोन दंगल नियंत्रण पथके व राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे, अशा प्रकारचा बंदोबस्त करता पोलीस उपस्थित असणार आहेत.

रंग विक्रीचे अनधिकृत स्टॉल हटवले

मिरा- भाईंदर शहरात होळीचे रंग, पिचकारी विक्रीचे स्टॉल उभारलेले दिसून येत होते. मिरा- भाईंदर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक चारच्या हद्दीत होळीचे रंग विक्री करता परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या सर्व स्टॉलवर सहायक आयुक्त सुधाकर लेंडवे यांच्या मार्फत कारवाई करत स्टॉल हटवण्यात आले आहेत. याच बरोबर वाहतूक पोलीस देखील होळी आणि धुलीवदंन असे दोन दिवस विशेष मोहीम राबवत मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर कारवाई करणार आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar