भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात १३ मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळी निमित्त अवैधपणे बेकायदा वृक्षतोड करणार्यांवर महापालिकेकडून लक्ष ठेवणार आहे. शहरात अवैध वृक्षतोड करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जातो. शहरातील अनेक भागांत झाडे तोडून त्यांची होळी उभारली जाते. होळीच्या सणानिमित्त अवैधरीत्या मोठ मोठी झाडे तोडली जातात. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी होळीनिमित्त कोणीही अवैधपणे झाडांची कत्तल करू नये यासाठी महापालिका खबरदारी घेत असून वृक्षतोड करणार्यावर कारवाई केली जाणार आहे.( Holi 2025: Municipality will take action if trees are cut down illegally during Holi)
अनधिकृत वृक्षतोड करणार्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, असा इशारा पालिकेच्या उद्यान विभागाने पत्रक काढून दिला आहे. तसेच वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महापालिकेला किंवा पोलीस ठाण्यास कळवावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.