Homeमहामुंबईपालघरआर्थिक गुन्हे शाखेकडे २१ महिन्यांत २७ गुन्हे दाखल

आर्थिक गुन्हे शाखेकडे २१ महिन्यांत २७ गुन्हे दाखल

Subscribe

आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २७ गुन्ह्यांपैकी काशिमीरा पोलीस ठाणे यादीत अव्वल स्थानावर आहे. तिथे चार गुन्हे दाखल आहेत.

भाईंदर : मिरा भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयात जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध पोलीस ठाण्यांकडून तपासासाठी पोलीस आयुक्त व अपर पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये २७ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी हस्तांतरित करण्यात आले आहेत. आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २७ गुन्ह्यांपैकी काशिमीरा पोलीस ठाणे यादीत अव्वल स्थानावर आहे. तिथे चार गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर मिरारोड पोलीस ठाणे येथे तीन, अर्नाळा आणि भाईंदर पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार घोटाळे, बहुस्तरीय मार्केटिंग योजना, पोंझी (फसवी ) योजना, चिट फंड घोटाळे, शासकीय निधीचा गैरवापर, बनावट चलन प्रकरणे आणि बनावट कागदपत्रे बनवणे तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततेसह इतर प्रमुख आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे विशेष करून हाताळली जातात. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशानंतर पोलिसांकडे नोंदवलेले ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक प्रकरणे पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली जातात. सामाजिक कार्यकर्ते-कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मिळवलेल्या आकडेवारीनुसार, १२ वर्षांपेक्षा जास्त जुन्या प्रकरणांसह ४३ प्रकरणे आर्थिक गुन्हे शाखेकडे अजूनही प्रलंबित आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar