डहाणू : उधवा -तलासरी राज्यमार्गावरील उधवा -नवापाडा वाणीपाडा येथील रत्नीखाडी नदीपात्रात नवजात पुरुष जातीचे मृत अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, तलासरी पोलीस मातापित्याचा शोध घेत आहेत. नदीपात्रावरील पुलाखाली गवतात अडकलेले मृत अर्भक पाहून परिसरातील शेतकर्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भक बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.एक ते दोन दिवसांचे हे नवजात अर्भक पाण्याच्या प्रवाहात वाहून आल्याचे आढळले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अर्भक नदीत फेकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हृदयद्रावक घटनेने उधवा परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “निर्दयीपणे नवजात अर्भक नदीत फेकणार्यांचा शोध घेऊन कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिसांकडून परिसरातील दवाखाने, प्रसूतिगृहे आणि स्थानिकांशी चौकशी करून अर्भकाच्या मातापित्याचा शोध घेतला जात आहे. “या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच सत्य बाहेर येईल,” असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.