पालघरः विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य धडे दिले तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे त्यांना प्रेरणा मिळते नेमकी ही बाब लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत पालघर जिल्ह्यातील साधारण अडीच ते तीन हजारपेक्षा अधिक शाळांमधील जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी योग दिनामध्ये उत्साहात सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत लायन्स क्लब ऑफ पालघरच्या सभागृहात योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने , जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यामधील शाळा,महाविद्यालये , विविध कंपन्या व विविध संघटनांमार्फत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. योगाची प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे शालेय विद्यार्थी करतील आणि त्यांच्या पालकांनासुद्धा योगासनाचे धडे देतील हा या मागच्या उद्देश होता.वसई येथील विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अंबिका योगाश्रम, ठाणे यांच्या वसई शाखेच्या सहकार्याने योगशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगसाधना हा एक दिवसाचा सोहळा न राहता व्यापक अर्थाने एक जीवनपद्धती म्हणून योगसाधनेकडे पाहायला हवे, असे आवाहान प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी यावेळी बोलताना केले. श्री अंबिका योगाश्रमचे राजीव मोहिले, जयवंत पवार, किरण गुप्ता,. मनोज राऊत, पार्वती भानुशाली, माया वदक, रिद्धी पाटील, सिद्धी पाटील आणि प्रा. डॉ. श्रीराम डोंगरे या योगशिक्षक आणि साधकांनी उपस्थितांना योगसाधनेमधील प्रार्थना, शुद्धिक्रिया, आसने, प्राणायाम, ओंकार साधना, सूर्यनमस्कार यांचा परिचय प्रात्यक्षिकांसह करून दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. आदिती यादव यांनी केले व प्रा. डॉ. फड यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, डॉ. हिरानंद खंबायत तसेच विविध विभागांतील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले.
नेहरू युवा केंद्र पालघरच्या वतीने सह्याद्री शिक्षण सेवा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय ,जुचंद्र व निसर्ग प्रेमी एडवेंचर क्लब याच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. प्राध्यापिका प्रियंका सुळे , कांचन शिंदे, मनीषा ठाकरे, प्राध्यापक गौतम गायकवाड, क्रीडाशिक्षक विलास कोटियन उपस्थित होते. योगाशिक्षिका भक्ती पाटील यांनी योगासनेची प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर मनिराम घायाळ, निसर्ग प्रेमी एडवेंचर क्लबचे रोहन कनोजिया यांनी योगदान दिले. विविध प्रकारच्या ताणतणावातून विद्यार्थ्यांनाही मुक्ती मिळावी आणि त्यासोबतच त्यांचे आरोग्यही चांगले राहावे यासाठी गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाकडून विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ शिंगवे यांनी विद्यार्थ्यांना योगाच्या महत्व पटवून देऊन योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ शिंगवे, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. दिलीप भोये, प्रा. माधुरी अहिरे, प्रा. मेघा सोनटक्के, प्रा. संदीप वाघचौरे, क्रीडा प्रमुख प्रा. कैलास पाटील, प्रा. रघुनाथ मोरे, सिद्धार्थ मोहिते आदींसह विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके केली. वाडा येथील योगवर्गात खासदार डॉ. हेमंत सवरा, बाबाजी काठोळे, मनीष देहेरकर, अॅड.संतोष डेंगाणे, रोहन पाटील, कुणाल साळवी, मिलिंद वाडेकर, हर्षल खांबेकर सहभागी झाले होते.