Homeमहामुंबईपालघरविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जनता दरबार

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जनता दरबार

Subscribe

तर काहींनी वाडा येथे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून तरी टोल वसुली केली जात आहे. लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी ही केली गेली.

पालघर: शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे राज्यभर ’’जनाधिकार’’ अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आज पालघर येथील काँग्रेस भवन हॉल येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालघर जिल्हा व शहरातील नागरिकांनी हजेरी लावत जनता दरबार कार्यक्रमात आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी यावेळेस नागरिकांनी अंबादास दानवे यांच्यासमोर मांडल्या. या दरम्यान केळवे येथे उड्डाणपूलाचे लवकरात लवकर निर्माण करण्यात यावे. पालघर जिल्ह्यातील ताडी उत्पादक व्यावसायिकांनी ताडी व्यवसायांशी निगडित समस्या मांडल्या. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या दुर्घटने विषयी तक्रारी करण्यात आल्या. पालघर शहरातील नवली येथे निर्माण होणार्‍या रेल्वे उड्डाणपूलाविषयी समस्या मांडण्यात आल्या. तर काहींनी वाडा येथे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून तरी टोल वसुली केली जात आहे. लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी ही केली गेली.

बोईसरमधील दांडिपाडा येथील जवळ पास शंभर कुटुंबाची घरे रेल्वे विस्तारीकरणात गेली असून आज पर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही, याबाबतही तक्रारी करण्यात आल्या. मोखाडा येथील आदिवासींचा स्थलांतरणचा मुद्दा यावेळी चांगलाच तापला असताना दानवे यांनी संबंधित अधिकार्‍याला धार्‍यावर धरले. बोईसर येथील एमआयडीसीमधील औद्योगिक सुरक्षा बाबतीत दानवेंनी अधिकार्‍याला चांगले सुनावले. यावेळी बांधकाम सामानाची वाहतूक करणार्‍यांनी शासनाकडून रॉयल्टी वेळेवर उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली. उर्वरित प्रकरणे जिल्हाधिकारी, राज्यस्तरावरील असल्याने संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन पाठपुरावा केला जाईल. यासाठी अधिकार्‍यांची स्वतंत्र टीम कार्यरत आहे, असे दानवे यांनी सांगितले. यावेळी पालघर जिल्हा ग्रामीणचे दोन्ही जिल्हा प्रमुख विकास मोरे, राजेंद्र पाटील, पालघर शहर प्रमुख भूषण संखे आणि इतर महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.