भाईंदर : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे ऐतिहासिक धेनुगळ ( वीरगुळ ) मुर्तीबाबत तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दितील मनोरी या गावामध्ये कारंजा देवी मंदिरामागे असलेल्या दोन जुन्या तोफा बाहेर काढून महापालिका मुख्यालयात ठेवण्यासाठी पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये, महाराष्ट्र यांच्याकडे प्रस्ताव सादर करत मागणी केली आहे. मिरा -भाईंदर महापालिका हद्दीतील मौजे उत्तन, चौक येथे जंजिरे धारावी किल्ला परिसरात पेशवेकालीन तोफ औजारे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खोदकाम करून निघणार्या तोफा आणि साहित्य जंजिरे धारावी किल्ल्यात ठेवण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाने ७ जुन २०२३ रोजी पत्राद्वारे उत्तन आनंदनगर येथील सवत्स धेनुगळ आणि बृहन्मुंबई हद्दितील कारंजादेवी मंदिरामागे असलेल्या दोन तोफा संचलनालयांच्या मार्गदर्शनाखाली काढून संग्रहीत करण्यास ना-हकरत दिलेली आहे.( Janjire Dharavi Fort: Demand for approval to keep historical cannon at the municipal headquarters)
पुणे येथील पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मे २०२३ मध्ये उत्तन भागातील पुरातन शिल्प, वास्तू आणि वस्तूंची पाहणी केली होती. त्याचा अहवाल पुरातत्व विभागाकडे सादर केला होता. जंजिरे धारावी किल्ल्याची जागा अद्यापपर्यंत महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे वीरगुळ आणि दोन जुन्या तोफा या काढून जंजिरे धारावी किल्ल्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नाहीत. काही दिवसापूर्वी पुरातन धेनुगळ या ठिकाणी काहींनी हे धेनुगळ धार्मिक असल्याचे समजून त्याठिकाणी लाईट आणि दानपेटी ठेवून फुलांची सजावट करून पुजा अर्चाचे काम सुरु केले. तसेच काही नागरिकांनी पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करून हे धेनुगळ व तोफा या मिरा भाईंदर महापालिका मुख्य कार्यालयात ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे हे धेनूगळ आणि तोफा पोलीस विभागाच्या सहकार्याने संरक्षित करुन आणि परवानगीनंतर महापालिका मुख्य कार्यालय आवारात ठेवण्यास आणि त्यानंतर जंजिरे धारावी किल्ला बांधकामावेळी त्या ठिकाणी ठेवण्यात येईल,असा प्रस्ताव शहर अभियंता दिपक खांबीत यांनी संचालक, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये, महाराष्ट्र यांना सादर केला आहे.