भाईंदर : मिरा- भाईंदर शहरात दहिसर चेकनाका परिसरात नेहमी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असल्याने पोलीस आयुक्तलयाच्या मार्फत शहरातील वाहतूक सुरळीत चालण्याकरिता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहतुकीचे व्यवस्थापन योग्य रितीने होण्याकरिता जड ,अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११.१५ वाजेपर्यंत वरसावे पोलीस चौकी फाऊंटन हॉटेल ते दहिसर टोल नाक्याकडे ( वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सर्व्हिस रोडवरून ) तसेच ठाणे- घोडबंदर रोड मार्गे मिरा-भाईंदर शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. दहिसर टोलनाका मार्गे मुंबईत प्रवेश करणार्या अवजड वाहनांना (ट्रक, ट्रेलर, मल्टी एक्सल वाहन आणि प्रवासी वाहतूक करणार्या सर्व प्रकारच्या आंतरराज्य आणि आंतरजिल्हा खासगी बसेस) सकाळी ८ ते सकाळी ११.३० वा. पर्यंत प्रवेश बंद केला आहे.
मुंबई वाहतूक विभागाकडून अधिसूचना पारित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दहीसर चेकनाक्यापासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे इतर लहान वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, अंबुलन्स, व्हिआयपी कॅनवाय इ. अडकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मिरा- भाईंदर शहरात राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील तसेच शहरातील इतर महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वर्सोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणार्या जड-अवजड वाहनांना वरसावे पोलीस चौकी, हॉटेल फाऊंटन याठिकाणा वरुन आत प्रवेश करण्यास प्रवेश बंद करणे वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक झाले आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नवीन वरसावे पुलावर सेल्फी घेण्यासाठी वाहने थांबतात. यामुळे सदर पुलावर वाहतूक कोंडी व अपघात देखील होत आहेत. मुंबई-ठाणे बाजूकडून गुजरात बाजूकडे जाणारे आणि गुजरात बाजूकडून मुंबई कडे येणार्या नविन पुलावर दोन्ही वाहिनीवर वाहन थांबण्यास प्रतिबंध नो-पार्किंग करण्यात आले आहे.
अधिसूचना या वाहनांना लागू राहणार नाही
सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालच्या हद्दीत येणार्या अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलीस वाहने, महसूल विभागाची वाहने, फायरब्रिगेड, पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्कूल बसेस, भाजी-पाला वाहून नेणारी वाहने, रुग्णवाहिका, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, जिल्हा दंडाधिकारी मुंबई, ठाणे, पालघर व मनपा आयुक्त मुंबई, मिरा- भाईंदर, वसई-विरार तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.