पालघर : लोकसेवक हा जनसेवेसाठी नेमलेला अधिकारी आहे. त्याने त्याचे चोख कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. लोकसेवेत कसूर व ज्यांना सरकारी चौकटीत राहून जुळवून घेता येत नसेल, त्यांनी जिल्ह्याबाहेर बदली करून घ्यावी असा सज्जड दम पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात दिला. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केला असून जनतेच्या मेहेरबानीसाठी नाही. त्यामुळे जनसेवेला प्राधान्य द्या, असा सल्ला पालकमंत्री नाईक यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी वर्गाला दिला. जनता दरबारात विविध विभागांशी विविध समस्या असलेले तब्बल ७४१ निवेदन अर्ज पालकमंत्र्यांकडे आले. यातील ३६ अर्ज जागीच निकाली काढण्यात आले.
उर्वरित अर्ज विभागाकडे पाठवून येत्या काही दिवसात त्याचा निपटारा केला जाईल, असे गणेश नाईक यांनी सांगितले. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी घोषणा अलीकडे झाली. हा जिल्हा पूर्वी ठाणे जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याची सर्वस्वी जाण मला आहे. कमी गुन्हेगारी असलेला हा जिल्हा असून या जिल्ह्याची झपाट्याने सुधारणा होत आहे, असे पालकमंत्री नाईक यांनी सांगितले. अधिकारी वर्गाने जनतेच्या समस्येवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्यातील कमतरता जाणून घ्यावी व नागरिकांची कामे करण्यात कमी पडत असल्यास बदली करून घ्यावी असे पालकमंत्री यांनी सांगितले. अनेक निवेदने आल्यानंतर सरकारी यंत्रणा या शासकीय नियमाला धरून चालत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र हे कार्यक्रम खपवून घेतले जाणार नाही. राजशिष्टाचारानुसार दिलेल्या आदेशाचे पालन करून ते पाळावेत असे आदेशही पालकमंत्री नाईक यांनी यावेळी दिले. आता जिल्ह्याचा जनता दरबार घेतला आहे. मात्र यापुढे जाऊन तालुक्यानीहाय जनता दरबार घेण्यात येणार आहे,असे नाईक यांनी म्हटले.