पालघर : भारतीय हवामान विभागाद्वारे मौसमी हंगामाच्या (मॉन्सूनच्या) प्रत्येक महिन्याचा अंदाज देण्यात येतो. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी प्रसारित हवामान अंदाजानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीच्या १०९% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट अहवाल पालघर जिल्ह्याची जून-ऑगस्टपर्यंत पावसाची सरासरी आकडेवारी १९८६.६ मिमी आहे आणि यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत १०२.९% (२०४३.३) पावसाची नोंद झाली आहे. मौसमी पावसाने एकूण सरासरी ओलांडली पण ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत १९.४ टक्के कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी ६६९. ७ मिमी पाऊस पडतो पण यावर्षी ५४०.१ (८०.६%) इतक्या पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे.
मान्सून मिशन क्लायमेट फॉरका स्टिंग मॉडेलनुसार मान्सून हंगामाच्या शेवटी ला-निनो परिस्थिती (ला-नीनो हवामान परिस्थिती अधिकच्या पावसाशी निगडित आहे) विकसित होण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये संपूर्ण कोंकणासह पालघर जिल्ह्यात सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विस्तारीत श्रेणी हवामान अंदाजानुसार ५-१२ सप्टेंबर आणि १२ ते १९ सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या महिन्यात पालघर जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.