पालघर: पालघर जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून लुप्त झालेल्या पावसाने शुक्रवारी संध्याकाळपासून दमदार हजेरी लावल्याने मागील १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे नाराज झालेल्या बळीराजा सुखावला आहे. शुक्रवार रात्री तसेच शनिवार आणि रविवारी झालेल्या चांगल्या पावसामुळे शहरी भागात काही ठिकाणी पाणी साचण्याच्या तुरळक घटना घडल्या. रविवारी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. सुदैवाने रविवार असल्यामुळे शाळा आणि कॉलेजना सुट्टी होती. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाचा शिडकाव काही होत नव्हता. संध्याकाळी साडेपाच नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रात्री सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झालेला पाऊस रविवार संध्याकाळपर्यंत कायम होता. शनिवारी आणि रविवारी पाऊस पूर्ण दिवस सुरू असल्यामुळे गेले काही दिवस हवेत असलेल्या उकाडा कमी होण्यास मदत झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
२४-२७ ऑगस्ट दरम्यान पालघर जिल्ह्यात पूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तसेच कमाल आणि किमान तापमानात २-३ अंश सेल्सिअस घट होवून कमाल तापमान ३१ ते ३२ आणि किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात वार्याचा वेग सरासरी १७ ते २२ किमी प्रति तास राहण्याचा अंदाजही अहवाल विभागाने दिला आहे.
शेतकर्यांना मोठा दिलासा
पालघर जिल्ह्यात शेतकर्यांचे भात हे मुख्य पीक आहे. जिल्हाभरात 76 हजार 644 हेक्टर क्षेत्रावर भात शेती पिकवली जाते. जून महिन्यात पडलेल्या पावसानंतर नांगरणी पेरणी रोपणी ही कामे जुलैपर्यंत पूर्ण झाली होती. शेतीसाठी आवश्यक असणारा पाऊस गेले काही दिवस दडी मारून बसला होता .मात्र हा पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पीक वाया जाईल की काय या चिंतेत असलेल्या शेतकर्यांची सुटका झाली आहे.