भाईंदर : मिरा- भाईंदरमध्ये नवीन वर्षात महापालिका प्रशासन सीबीएसई शाळा सुरु करणार असून त्यासाठी येत्या एप्रिल महिन्यात त्याची जाहिरात काढून त्यात नर्सरीमध्ये २० आणि ज्युनियर केजीमध्ये २० विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहे. त्यासाठी लॉटरी पद्धतीने प्रवेश होणार आहे. भाईंदर पूर्व इंद्रलोक आरक्षण क्रमांक ११५ मधील शाळा इमारतीचे बांधकाम या वर्षी पूर्ण झाले असून सदरील इमारत ही आर.एन.ए. या विकासकाकडून विकास हक्क प्रमाणपत्राच्या मोबदल्यात तळ अधिक पाच मजल्याची इमारत बांधण्यात आली आहे. महापालिकेकडे इमारत हस्तांतरित झाली आहे. या इमारतीच्या चारही बाजूस कुंपण भिंत असून लॅन्ड स्केपिंग करण्यात आलेले आहे. तसेच चार लिफ्ट या शाळा इमारतीत आहेत. प्रत्येक मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी स्वत्रंत स्वछतागृह तयार करण्यात आले असून या इमारतीमध्ये १२५ केव्ही क्षमतेचे जनरेटर बसविण्यात आले आहेत. या इमारतीत महापालिका सीबीएसई शाळा सुरू केली जाणार आहे.
पालिकेला स्वतःच्या इंग्रजी शाळा सुरु करण्यास शासनाची परवानगी आली असून व पहिली पाच वर्षे महापालिकेला त्यासाठी राज्य सरकारने अनुदान देणार आहे, तशी मागणी पालिकेने शिक्षण मंत्र्यांकडे केली होती. त्याला त्यावेळीच शिक्षण मंत्र्यांनी तत्वतः मान्यताही दिली होती. खासगी शाळांच्या लाख – लाख रुपये फी गरिबांना परवडत नाहीत. त्यामुळे पालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.