जव्हार: स्वच्छ आणि सुंदर जव्हार शहरात शेवटचा वापरकर्ता म्हणून काही नागरिक हे एकल प्लास्टिकचा सर्रास वापर करीत आहेत. यामुळे शहरात ठीक ठिकाणी प्लास्टिक पडल्याचे दिसत आहे. याबाबतची तक्रार सुजाण नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केलू असता प्लास्टिक वापरणार्यांवर कारवाई करत नगरपरिषद अॅक्शन मोडवर येत आहे.
एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री शहरात करणार्यांवर नगरपरिषदेने मुख्याधिकारी तथा प्रशासक मानिनी कांबळे यांच्या मार्गदर्शनात धडक मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. नगर परिषद हद्दीतील दुकानांची झाडाझडती घेण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
शहरातील विविध दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषदेने ही मोहीम हाती घेतली आहे. संबंधितांना दंड करण्याचा इशारा नगर परिषदेने दिल्याने अनेक दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील व्यावसायिक, दुकानदार, भाजी विक्रेते आदी बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू, पिशव्यांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. सिंगल-यूज प्लास्टिक किंवा डिस्पोजेबल प्लास्टिक एकदा वापरले जाते आणि नंतर फेकले जाते किंवा पुनर्वापर केला जातो. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ आदी वस्तूंचा समावेश आहे. एकल प्लास्टिक पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. जर आपण ते जाळले, तर वायू प्रदूषण निर्माण होते. जे आरोग्य आणि पर्यावरणास हानिकारक आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाकडून याचा वापर न करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.
जव्हार शहरातील नागरिकांना, दुकानदारांना एकल प्लास्टिक वापर न करण्याचे आवाहन वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाने केले आहे. एकल प्लास्टिकमुळे जनावरांच्या आरोग्यास बाधा पोचत आहे. एंड युजर नागरिक रस्त्यावर प्लॅस्टिक टाकून देतात. यामुळे कचरा होतो. शिवाय ते जनावरे खातात. यामुळे बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. जर कोणी असे प्लास्टिक वापरताना आढळून आले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– मानिनी कांबळे, मुख्याधिकारी,जव्हार नगर परिषद.