वसई : वसई -विरार शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी वसई -विरार महापालिकेने डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी शोधून काढली असून तेथे विशिष्ट रसायनाचा वापर करून डासांचा समूळ नायनाट केला जाणार आहे. औषध फवारणी देखील आता दोन वेळेस करण्यात येणार आहे.यासाठी पालिकेने डासांचा नायनाट करण्यासाठी डासांचा सर्वाधिक प्रभाव असलेली ठिकाणे शोधून काढली आहे. या ठिकाणी असलेल्या खाडी, नाले, डबक्यातील पाणवेली काढून तेथे विशिष्ट रसायनाची फवारणी केली जाणार आहे. त्यामुळे डासांना ऑक्सीजन मिळणार नाही आणि डास समूळ नष्ट होतील, असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. या रसायनाची मात्रा कमी असल्याने खाडीतील इतर जीवतंतूवर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वसई- विरार शहरात डासांची भयंकर समस्या वाढली आहे. संध्याकाळच्या वेळेत आकाशात पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे डासांचे थवे दिसत असतात. संध्याकाळच्या वेळी आकाशात पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे डासांचे थवे दिसू लागले आहेत. डासांच्या उपद्रवामुळे संध्याकाळपासूनच नागरिकांना घरांच्या खिडक्या, दारे बंद करून हातात मच्छर मारण्याच्या बॅट घेऊन बसावे लागत आहे. डासांचा उपद्रव वाढू लागल्याने ज्येष्ठ नागरिकांनी संध्याकाळी उद्यानात, मोकळ्या जागेत फिरायला जाणे बंद केले आहे. या डासांमुळे नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे.डासांच्या निर्मूलनासाठी पालिका वार्षिक ४० कोटींचा खर्च करत आहे. यासाठी रसायनावर सव्वा कोटी आणि मनुष्यबळावर सव्वा कोटी खर्च होत आहेत. महिन्याला साधारण अडीच ते सव्वा तीन कोटी एवढा खर्च डास निर्मूलनासाठी करण्यात येत आहे. याबाबत बोलताना,डासांचा बिमोड करण्यासाठी औषध फवारणी आता सकाळी आणि संध्याकाळी असा दोन्ही वेळेस करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आले असून त्यानुसार कर्मचार्याच्या कामाच्या पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा) नानासाहेब कामठे यांनी दिली.