विरार : वसई – विरार शहर महानगरपालिकेला समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नामांकन करण्यात आले आहे. १३ किनारी राज्यांमध्ये राज्य सरकार स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम मोहिम हाती घेण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त उपक्रम मोहिम २१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्याचे पर्यावरण व हवामान बदल विभाग, राज्य शासन यांनी निर्देश दिले होते. राष्ट्रीय किनारपट्टी कचरामुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, जागतिक महासागर आणि जलमार्गांचे जतन व संरक्षण करण्याबद्दल लोंकामध्ये जागृकता निर्माण करणे हे हा दिवस साजरा करण्याचा मुळ उद्देश होता. त्या अनुषंगाने वसई विरार पालिकेने दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी विरार पूर्वेकडील राजोडी बिच येथे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप दिवस ( ICCD ) गो-शुन्य प्रा. लि. यांच्या सहयोगाने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
सदर मोहिमे अंतर्गत शहरातील स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, NCC व NSS विद्यार्थी, महिला बचतगट, लोकप्रतिनिधी, पत्रकार वर्ग, सामान्य नागरीक, तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी एकुण १५ हजार हून अधिक सहभागी उपस्थित होते. एकुण ५३ मेट्रिक टन कचरा संकलन करून त्यातील ६६२ कि.ग्र. प्लास्टिक कचर्याचे रिसायकल प्रात्याक्षिक (Demonstration) नागरीकांना दाखविण्यात आले.
प्रतिक्रिया 1
आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग सर्वोच्च कचरा संकलन तसेच प्लास्टिक कचर्याचे Live Recycling या तीन श्रेणीमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे,
नानासाहेब कामठे – उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग
प्रतिक्रिया 2
समुद्र किनार्याचे सौंदर्य अबाधित ठेऊन, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महापालिकेने सुरू केलेली ही मोहिम, केवळ आजची आवश्यकता नाही, तर आगामी पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. महापालिका, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मोहिमेमध्ये सहभागी होणार्यांच्या मदतीने समुद्र किनार्यांच्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
अनिलकुमार पवार – आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका