पालघर: पालघर जिल्ह्यात नव्याने होणार्या वाढवण बंदराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्या, मनोर बर्न सेंटर त्वरित कार्यान्वित करा, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांचे ऑडिट करा, डहाणू येथील कासा आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीनसाठी टेक्निशियन उपलब्ध करुन द्या, अशा मागण्या आमदार निरंजन डावखरे यांनी पालघर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्या. पालघर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक अध्यक्षस्थानी तर प्रमुख विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पालघर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
मनोर येथे उभारण्यात आलेल्या बर्न सेंटरच्या वास्तूचे काम पूर्ण झाले असून आवश्यक वैद्यकीय अधिकार्यांच्या नियुक्तीअभावी हे केंद्र अद्याप कार्यान्वित नाही. आमदार डावखरे यांनी तातडीने डॉक्टर आणि अन्य आवश्यक कर्मचार्यांची नियुक्ती करून हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली. अधिकार्यांनी कार्यभार स्वीकारताच हे बर्न सेंटर अनेक रुग्णांसाठी वरदान ठरेल, अशी माहिती आमदार डावखरे दिली. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आढळतो आणि म्हणून या सर्व शाळांचे एक ऑडिट करणे आवश्यक आहे असे डावखरे यांनी बैठकीत नमूद केले. डहाणू येथील जिल्हा परिषद शाळा, मल्याण मराठी येथे विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत शौचालय दुरुस्तीची मागणी आमदार डावखरे यांनी केली. डहाणू येथील कासा आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपयांच्या सोनोग्राफी मशीन आहेत. मात्र टेक्निशियन नसल्यामुळे त्या निष्क्रिय आहेत. परिणामी, रुग्णांना खासगी रुग्णालयात अधिक खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी त्वरित टेक्निशियनची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली. पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये रोस्टर तपासणी त्वरित करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे आमदार डावखरे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रक्रिया पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने पार पडाव्यात, यावर त्यांनी भर दिला. डिजिटल शाळा, आदर्श शाळा आणि नावीन्यपूर्ण योजना व इतर काही योजनांसाठी मार्चपर्यंतचा खर्च शून्य असल्याचे समोर आले. ही अत्यंत गंभीर बाब असून, संबंधित विभागाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.