भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्याना शेजारील महापालिकेचा नवीन घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प लोकभावनेचा आदर करून रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. तथापि, घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प उभारणे काळाची गरज असून केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून शहरात ठीक ठिकाणी घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प बनवले जात आहेत. परंतु घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प रहिवासी क्षेत्रापासून किमान ५०० मीटर अंतरावर उभा रहावेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. या निर्णयाला उपस्थित नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाच्या शेजारी असलेल्या घनदाट वृक्ष क्षेत्राच्या जागेवर महापालिकेने नवीन घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प करण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देण्यात आले होते. मात्र या क्षेत्रातील रहिवाशांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. ज्या जागेमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार होता तिथे १२०० ते १३०० वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. त्यांची कत्तल करून घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प येथे राबवणे उचित नाही. तसेच रहिवाशी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प राबविल्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ शकते, आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, यासाठी या भागातील नागरिकांनी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी या उद्यानाला भेट दिली. तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आणि घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प तातडीने रद्द करावा आणि तो इतर ठिकाणी स्थलांतरित करावा, असे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.