वसई : नैसर्गिक वनसंपदा असलेल्या पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्र तब्बल ८७ चौरस किलोमीटर घटले आहे. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भूमाफियांकडून होणारे भराव, बांधकामे आणि झांडाची कत्तल होत असल्याने हिरवा पट्टा नष्ट होऊ लागला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील २४ जिल्ह्यातील १ हजार ७७८ वनक्षेत्र घटले असून त्यात सर्वाधिक घट ही पालघर जिल्ह्यातील आहे.पालघर जिल्ह्यातील नैसर्गिक जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून अनधिकृत बांधकामे करण्यास सुरूवात केली आहे. वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे होत आहे.( Palghar Forest: The forest area of Palghar district has decreased by as much as 87 square kilometers)
यामुळे जिल्ह्यातील हिरवा पट्टा नष्ट होऊ लागला आहे. पालघर जिल्ह्यात वन क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने जंगलाचे व पशुपक्ष्यांचे संवर्धन व्हावे, म्हणून वन विभागामार्फत एकूण २४८.३८ चौरस किलोमीटर राखीव क्षेत्राची घोषणा वनविभागाने केली होती. त्यानुसार जव्हार (११८.२८) डहाणू ( ४९. १५) आणि धामणी येथे धामणीमध्ये (८०.९५) चौरस किलोमीटर राखीव वनक्षेत्रे आहेत. याशिवाय पालघर, वसई, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तालुक्यात वनहक्क पट्ट्यांचे क्षेत्र २८ हजार ९०० हेक्टर इतके आहे. मात्र भू माफियांनी अनधिकृत बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणवर जंगलतोड करून वनक्षेत्रावर कब्जा केला आहे. त्यामुळे ८७ चौ.कि.मी. म्हणजेच एकूण वनक्षेत्राच्या ३५ टक्के वनक्षेत्र घटले आहे. वसई -विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहे. त्यात सर्वाधित बांधकामे ही वनखात्याच्या जागेवर होत आहेत. राजवली, वाघरळ पाडा येथे वनखात्याच्या जमिनींवर जंगलतोड करून मोठमोठ्या अनधिकृत वसाहती उभ्या राहिल्या आहेत.महाराष्ट्र देशातील सर्वाधिक म्हणजे १४,५२५ चौ.कि.मी इतके सर्वात जास्त वृक्षाच्छादन आहे. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) अहवालानुसार २०२१ ते २०२३ या दोन वर्षात राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांनी एकूण १ हजार ७७८ चौ.कि.मी. खुले जंगल आणि २६७ चौ.कि.मी. झुडपी जंगल गमावले आहे. त्यात सर्वाधिक ८७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र पालघर जिल्ह्यातील घटले आहे.