डहाणू : गुजरातच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नामे निराली या बोटीला भीषण अपघात झाल्याने पालघर जिल्ह्यातील झाई गावातील चार मच्छीमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दोन मच्छीमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे झाई गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नामे निराली ही मासेमारी बोट १८ फेब्रुवारी रोजी दहा खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाली होती. तब्बल १६ दिवस मासेमारी केल्यानंतर किनार्याकडे परतत असताना बोट अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत चार मच्छीमारांचा जागीच बुडून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी अवस्थेत बचावले. गुजरात सरकारच्या मदतीने जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Palghar News: Four fishermen from Palghar drowned in a terrible boat accident)
या अपघातात अक्षय वाघात,अमित सुरम, सुरज वळवी,सूर्या शिंगडा या चार मच्छिमारांचा मृत्यू झाला असून अनिल वांगड आणि जलाराम वळवी हे गंभीर जखमी आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक मच्छीमार रोजगारासाठी गुजरातमधील मोठ्या मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. मात्र खोल समुद्रात मासेमारी करताना सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांमध्ये मोठ्या त्रुटी असल्याचे या दुर्घटनेतून स्पष्ट होत आहे. या दुर्घटनेनंतर मच्छीमारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. या अपघातानंतर झाई गावात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावातून या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने या दुर्घटनेची चौकशी करून मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.