भाईंदर : मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत परिमंडळ 1 अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यात एकाच वेळी गुरुवारी सायंकाळपासून कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या ऑपेरेशन करता जवळपास 30 टीम तयार करण्यात आल्या आहेत. कोंबिंग ऑपरेशन करता एकूण संशयास्पद तीस ठिकाणे ठरवण्यात आली असून तीस टीम तयार करण्यात आल्या आहेत. या परिसरात गेल्यानंतर घराची झडती घेत त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड मागण्यात आले आहेत. त्याच बरोबर काही जणांशी बंगाली भाषेत देखील संवाद साधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. संशयित वाटणार्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना चौकशी करता पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले असून त्यांच्या कडे कायदेशीर कागदपत्र आढळून आली नाहीत तर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. याच बरोबर या ऑपेरेशन करता एक विशेष फॉर्म तयार करण्यात आला असून त्यात संशयास्पद वाटणार्या सर्व नागरिकांची माहिती भरून घेतली जाणार असून त्याची नंतर पडताळणी केली जाणार आहे.
त्यात काही चुकीचे आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.याआधी मिरा भाईंदर शहरात काही दिवसांपूर्वीच आश्रया करता श्रीलंकेतून पळून आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले होते. अवैधपणे बिनापरवाना, पासपोर्ट, व्हिसाबिना राहणारे परकीय नागरिक, (बांगलादेशी, म्यानमार ) याव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाचे असतील याचा शोध या टीम घेणार आहेत. अवैध दारू, हत्यारे, यांचा देखील शोध घेतला जाणार आहे. शहरातील सर्व हॉटेल लॉज देखील तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
आतापर्यंत या ठिकाणी कोंम्बिंग ऑपरेशन
1) भाईंदर पश्चिम येथील भोला नगर,
2) सुभाष चंद्र बोस मैदान जवळील झोपडपट्टी,
3) नवघरच्या हद्दीत एस.एन. कॉलेज जवळ
4) तपोवन शाळे समोरील मोकळी जागा
5) जैन नगर
6) प्रमोद महाजन हॉल मागील इमारत
7) नयानगर परिसरातील बॅक रोड
8) तसेच इतर परिसर पोलिसांनी पायी फिरत परकीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी पिंजून काढले आहेत
…तर घर मालकावर देखील गुन्हा दाखल होणार
मिरा भाईंदर शहरात कोणालाही घर भाड्याने देताना त्याची कागदपत्रे पडताळणी करावी. त्याच बरोबर आपण घर भाड्याने देताना पोलिसांना भाडेकरूबाबत माहिती देणे बंधनकारक आहे. कोणत्याही परकीय नागरिकाला कागदपत्र नसताना देखील घर भाड्याने दिल्यास घर मालकावर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे घर भाड्याने देताना पोलिसांना माहिती देण्यात यावी असे आवाहन परिमंडळ -1 चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.