Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरअमली पदार्थ विक्रेत्याकडून लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

अमली पदार्थ विक्रेत्याकडून लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

Subscribe

पैसे न दिल्यास कारवाई करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. त्याबाबत त्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाकडे तक्रार केली होती.

वसई: नालासोपार्‍यात प्रत्यक्षात पोलिसच अमली पदार्थांना संरक्षण देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुळींज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्‍याने अमली पदार्थ विक्रेत्याकडून दरमहा ५० हजारांची लाच मागितली होती. ती लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ अटक केली.विठ्ठल सागळे (३४) पोलीस शिपाई हा तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार हा एमडी (मॅफेड्रॉन) नावाचा अमली पदार्थ विक्री करतो. त्याला तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थाची विक्री करायची होती. त्याला पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याने संपर्क केला. जर माझ्या हद्दीत अमली पदार्थ विक्रीचा हा धंदा सुरू ठेवायचा असेल तर महिन्याला ५० हजार रुपये द्यावे लागतील असे पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याने तक्रारदाराला सांगितले होते. ( Police constable arrested while accepting bribe from drug dealer)

पैसे न दिल्यास कारवाई करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. त्याबाबत त्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत विठ्ठल सागळे याने ५० हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता. लाचेची ५० हजारांची रक्कम पान टपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्या मार्फत स्विकारताना सागळे आणि गुप्ता याला अटक करण्यात आली. ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे, पोलीस हवालदार योगेंद्र परदेशी, महिला पोलीस हवालदार शमीम शेख, बर्गे आदींच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Edited By Roshan Chinchwalkar