वसईः देहव्यापारासाठी महिलांची विक्री करणार्या एका महिला दलालाला अटक करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने अटक करून दोन पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ससूपाडा येथील किनारा ढाब्याजवळ एक महिला दलाल वेश्यागमनासाठी मुलींची विक्री करणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली होती. त्यानंतर पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून एक बोगस गिर्हाईक पाठवले होते. यावेळी महिला दलाल सुरेखा अजय बोराडे (२८, रा. निलकमल चाळ, मनाली व्हिलेज, काशिमीरा) हिने बोगस गिर्हाईकाकडून पैसे घेताना रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागली. या कारवाईत पोलिसांनी तिच्या तावडीतून दोन पिडीत महिलांची सुटका केली. सुरेखा बोराडे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या गिर्हाईकांशी संपर्क करून देत असे. त्याबदल्यात ती गिर्हाईकांकडून एका महिलेसाठी दहा हजार रुपये घेऊन पिडीतेला फक्त दोन हजार रुपये देत असल्याचे तपासात उजेडात आले.
महिला दलालाला अटक,दोन पिडीत महिलांची सुटका
written By My Mahanagar Team
Bhayandar